नवी दिल्ली : पहलगाममध्ये पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर सुरक्षिततेचा मुद्दा चिंतेचा झाला आहे. त्यात कठुआ जिल्ह्यात चार संशयित व्यक्ती दिसून आल्याची माहिती एका महिलेने सुरक्षा दलांना दिली. त्यानंतर कठुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमध्ये सुरक्षा दलांनी सर्वात मोठी शोधमोहीम हाती घेतली आहे. सर्व यंत्रणा अलर्टवर आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, परिसरात चार संशयित व्यक्तींना बघितल्याची माहिती एका महिलेने पोलिसांना दिली. त्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली. महिलेने दिलेल्या माहितीनंतर खळबळ उडाली आहे. सुरक्षा दलांनी तात्काळ पावलं उचलली आहेत.
जम्मू-काश्मीर पोलिसांचे स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप अर्थात एसओजीचं पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचलं. स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. परिसरात घेराव घातला. येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींवर, तसेच संशयित हालचालींवर करडी नजर ठेवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा परिसर आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आहे. यापूर्वीही या ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न झालेला होता. संशयित व्यक्ती एखाद्या मोठा घातपात घडवून आणण्याच्या तयारीत असू शकतात, असा सुरक्षा यंत्रणांना संशय आहे. पोलीस आणि सैन्यदलाचे जवान शोधमोहीम राबवताना सावधगिरी बाळगत आहेत. ड्रोन आणि स्निफर डॉग्जच्या मदतीने शोध घेतला जात आहे.
पुलवामामध्येही शोधमोहीम
पुलवामामधील करीमाबाद परिसरातही सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली आहे. या ठिकाणी दहशतवादी लपून बसतात, असं अनेकदा स्पष्ट झालेले आहे. तसेच परिसरात दहशतवाद्यांसोबत चकमकी झाल्याचेही वृत्त असते. सध्या हा परिसर घेरला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta