
नवी दिल्ली : भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम फत्ते केली. भारतीय वायुदलाने आज मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले होते.

उल्लेखनीय बाब म्हणजे, या मोहिमेत भारतीय सेनेने पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. भारतीय सेनेने या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या कॅम्पचे अचूक लक्ष्य साधले. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय सेनेले बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचे हेडक्वार्टर उद्ध्वस्त केले.
भारताने दहशतवादाविरुद्धच्या लढाईला एक नवं वळण देत ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, ‘ऑपरेशन सिंदूर’ ही सेना, वायुदल आणि नौदलाची संयुक्त कारवाई होती, ज्यामध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ला करण्यासाठी अचूक शस्त्रांचा वापर करण्यात आला. या कारवाईत, भारतीय वायूदलानं पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या 9 दहशतवादी तळांवर लक्ष्य साधत हल्ले केले. रात्री 1.30 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबादमध्ये हवाई हल्ले करण्यात आले आहेत.
भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधानांची प्रतिक्रिया
भारताच्या हवाई हल्ल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. शाहबाज शरीफ यांनी सोशल मीडियावर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानी भूमीवर पाच ठिकाणी ‘भ्याड हल्ले’ करण्यात आले आहेत. पंतप्रधान शरीफ यांनी लिहिलंय की, या युद्धजन्य कृत्याला कडक प्रत्युत्तर देण्याचा पाकिस्तानला पूर्ण अधिकार आहे आणि ते प्रत्युत्तर दिले जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta