
नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूर आणि वेगवान ड्रोन हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. भारतीय सैन्याने गुरुवारी रात्री लाहोर, कराची आणि इस्लामाबादपर्यंत आत शिरुन ड्रोन हल्ले केले होते. त्यामुळे पाकिस्तानने दाऊद इब्राहिम, छोटा शकील आणि मुन्ना झिंगडा या तिघांना सेफ हाऊसमध्ये हलवले आहे. काही जणांच्या मते हे तिघेजण भारताच्या भीतीने पाकिस्तान सोडून दुसऱ्या देशात पळून गेल्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद हा पाकिस्तानमध्ये असल्याची चर्चा आहे. पाकिस्तानने त्याला कराचीत संरक्षण देऊन सुरक्षित ठेवल्याचेही सांगितले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये अगदी आतवर मुसंडी मारत ड्रोन हल्ले केले आहेत. भारतीय सैन्याने लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीमही उद्ध्वस्त केली होती. त्यामुळे युद्धाचा भडका उडाल्यास भारतीय सैन्य कराची आणि इस्लामाबादपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दाऊद इब्राहिम प्रचंड घाबरला असून तो सुरक्षित जागा शोधत फिरत असल्याची माहिती आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, दाऊदविषयी समोर येणाऱ्या वृत्तांवर भारतीय सुरक्षा यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. कदाचित दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानच्या दुसऱ्या भागात लपून बसला असेल. मात्र, भारताची दिशाभूल करण्यासाठी जाणीवपूर्वक तो देशातून पळून गेल्याची अफवा पसरवल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta