
नारायणपूर : छत्तीसगडच्या दंतेवाडा, नारायणपूर आणि बीजापूर जिल्ह्यामध्ये माओवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलांनी सकाळी ११ वाजेपर्यंत २७ माओवाद्यांना ठार मारले. या चकमकीत एक जवान शहीद झाला तर एक जवान जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.
नारायणपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक प्रभात कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या अबुझमद परिसरात सकाळी सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. अबुझमद भागातील माड परिसरात माओवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) नारायणपूर, डीआरजी दंतेवाडा, डीआरजी बिजापूर आणि डीआरजी कोंडागाव यांचे संयुक्त पथक माओवाद्यांविरोधी कारवाई करण्यासाठी रवाना करण्यात आले. त्यानंतर याठिकाणी झालेल्या चकमकीत २७ माओवाद्यांचा खात्म करण्यात आला. सध्या घटनास्थळावर शोधमोहिम सुरू आहे.

छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा म्हणाले, ‘या चकमकीमध्ये आमचा एक जवान जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जवानांनी २७ हून अधिक माओवाद्यांना मारले. अंतिम शोध मोहीम सुरू आहे.’ दरम्यान, केंद्र सरकारने देशाला माओवादीमुक्त करण्यासाठी ३१ मार्च २०२६ ही अंतिम मुदत दिली आहे. त्यामुळे सुरक्षा दलाकडून माओवाद्यांवर सतत कारवाई केली जात आहे. छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील करेगुट्टालूच्या डोंगरात माओवाद्यांविरोधात २१ दिवस कारवाई करण्यात आली.

Belgaum Varta Belgaum Varta