अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराण यांच्यात शस्त्रसंधीबाबत एकमत झाल्याचा दावा केला आहे. परंतु इराणकडून त्यांचा हा दावा फेटाळण्यात आला. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी इराण आणि इस्रायलमध्ये शस्त्रसंधी झाल्याचा दावा फेटाळला. सध्या असा कोणताही करार झालेला नाही, असे अराघची यांनी म्हटले आहे. भारत पाकिस्तान दरम्यान आपणच शस्त्रसंधी घडवून आणली, असा दावा यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. भारतानेही ट्रम्प यांचा दावा फेटाळला होता.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतर काही तासांनी म्हणजे पहाटे ४.१६ वाजता इराणी परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सोशल प्लॅटफॉर्म X वर आपला संदेश पोस्ट केला. ते म्हणाले, अजून युद्धबंदी किंवा लष्करी कारवाया संपवण्याबाबत कोणताही करार झालेला नाही.इराणवर इस्त्रायलने हल्ले सुरू केले होते. इराणने केवळ स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तर दिले. यामुळे युद्ध थांबवण्याची जबाबदारी देखील इस्रायलवर आहे. इस्रायलला प्रथम हल्ले थांबवावे. इस्रायलने हल्ले थांबवले तर इराण देखील प्रत्युत्तर देणार नाही.
आधी इस्त्रायलने हल्ले थांबवावे
अराघची यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, इराणने वारंवार स्पष्ट केले आहे की, इस्त्रायलविरुद्ध युद्ध इराणने सुरू केले नाही. इस्त्रायलकडून त्याची सुरुवात झाली. आतापर्यंत दोन्ही देशांदरम्यान कोणत्याही युद्धबंदी किंवा लष्करी कारवाया संपवण्याबाबत कोणताही करार झालेला नाही. इस्रायलने इराणवरील आक्रमण थांबवले तर आम्ही हल्ले थांबवणार आहोत. आमच्याकडून लष्करी कारवाया संपवण्याचा अंतिम निर्णय इस्त्रायलकडून हल्ले थांबल्यानंतर घेतला जाईल.
Belgaum Varta Belgaum Varta