
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराण यांच्यात शस्त्रसंधीबाबत एकमत झाल्याचा दावा केला आहे. 12 दिवसांनंतर दोन्ही देश युद्ध थांबवण्यास तयार झाले आहे, असे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथवर म्हटले आहे. अमेरिकेने इराणच्या तीन अणू प्रकल्पांवर हल्ला केल्यानंतर इराण-इस्त्रायल संघर्ष तीव्र होण्याची शक्यता होती.
13 जून रोजी इस्रायलने इराणच्या अणू प्रकल्पांवर हल्ले केले होते. गेल्या 12 दिवसांपासून दोन्ही देशांमधील संघर्ष सुरू आहे. या संघर्षात इस्रायलला अमेरिकेचाही पाठिंबा मिळाला. त्यानंतर अमेरिकेनेही या युद्धात उडी घेतली. अमेरिकन सैन्याने इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला केला. अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर इराणने पलटवार केला. इराणने कतारमधील दोहा येथील अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे डागले. यामुळे इराण-अमेरिका तणाव वाढण्याची शक्यता वाढली होती. मात्र, आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणमध्ये शस्त्रबंदीबाबत निर्णय झाल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सर्वांचे अभिनंदन! इराण आणि इस्रायलमध्ये पूर्ण युद्धबंदी झाली आहे. युद्धबंदी सहा तासांच्या आत सुरू होईल. इराणला प्रथम त्याचे पालन करावे लागेल. इराणने युद्धबंदीचे पालन केल्यानंतर पुढील 12 तासांनंतर इस्रायल युद्धबंदीत सामील होईल. 24 तासांनंतर युद्ध औपचारिकपणे संपल्याचे मानले जाईल. मी इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांचे, त्यांच्याकडे असलेली सहनशक्ती, धैर्य आणि बुद्धिमत्ता याबद्दल अभिनंदन करू इच्छितो.
Belgaum Varta Belgaum Varta