
मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) दहावीची परीक्षा या शैक्षणिक वर्षापासून दोनदा होणार असून फेब्रुवारी व मे अशा दोन संधी विद्यार्थ्यांना एका वर्षांत मिळतील. फेब्रुवारीत होणारी परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असेल. फेब्रुवारीतील परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि गुण सुधारायचे असतील अशा विद्यार्थ्यांना मे महिन्यात होणाऱ्या परीक्षेची संधी मिळणार आहे.
सीबीएसईकडून दहावीची परीक्षा वर्षातून दोनवेळा घेण्यात येणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी सीबीएसईने परिपत्रक जाहीर करून यंदापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचे जाहीर केले. परीक्षेचा कालावधी, नियम, निकाल जाहीर करण्याचा कालावधी या बाबी स्पष्टपणे जाहीर केल्या आहेत. विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी व्हावा, त्यांना कामगिरी सुधारण्यासाठी संधी मिळावी आणि शिकवण्यांची संस्कृती कमी व्हावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
खेळाडूंसाठी खास सवलत
राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर शाळेचे किंवा देशाचे नेतृत्त्व करणाऱ्या खेळाडूंना सवलत देण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान राष्ट्रीय किंवा आंततराष्ट्रीय स्पर्धा आल्यास खेळाडू दोनपैकी कोणत्याही एका परीक्षेची निवड करू शकतील. त्यासाठी त्यांना ग्राह्य पुरावा किंवा प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश
राज्यमंडळाच्या विद्यार्थ्यांना एटीकेटीची सवलत मिळते. तशाच स्वरूपाची तरतूद आता सीबीएसईनेही केली आहे. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या मुख्य परीक्षेत एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सीबीएसई मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालांमध्ये अकरावीच्या वर्गांत तात्पुरता प्रवेश देण्यात येईल. हे विद्यार्थी मे महिन्यात होणाऱ्या दुसऱ्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास त्यांचा प्रवेश निश्चित होईल.

Belgaum Varta Belgaum Varta