
ओडिसा : ओडिसामध्ये सुरू असलेल्या भगवान जगन्नाथ यांच्या रथ यात्रेदरम्यान रविवारी आज श्रीगुंडिचा मंदिरासमोर पहाटे ४:३० वाजण्याच्या सुमारास चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. या दुर्देवी घटनेत तीन भक्तांचा मृत्यू झाल्याचे समजते. तर १० ते १२ भाविक गंभीर जखमी आहेत. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. चेंगराचेंगरीची घटना घडली त्यावेळी रथ यात्रेमध्ये आरडाओरड अन् गोंधळाचे वातावरण होते.
रथ यात्रेत चेंगराचेंगरीची दुर्घटना श्रीगुंडिचा मंदिरासमोरील शरधाबली परिसरात घडली. रथावर विराजमान भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. पहाटेपासूनच भक्त मोठ्या संख्येने मंदिर परिसरात जमले होते. दर्शनासाठी झालेल्या धक्काबुक्कीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. काही भाविक जमिनीवर पडले आणि त्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. पोलिस आणि स्वयंसेवकांना गर्दी व्यावस्थित नियंत्रित केली नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे.
सर्व मृतक ओडिसामझील खुर्दा जिल्ह्यातील राहणारे आहेत. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. ७० वर्षीय प्रेमाकांत, प्रभाती दास आणि बसंती साहू यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. तिघेही धक्काबुक्कीमुळे गर्दीत जमिनीवर कोसळले अन् पायाखाली चिरडले गेले. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. अनेकजण जखमी झाले. दुर्घटनेतील जखमींना तातडीने जवळच्या पुरी सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta