
मेरठ : उत्तर प्रदेशच्या हापुडमधील मेरठ-बुलंदशहर महामार्गावर हा अपघात झाला. एकाच दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या ५ जणांना ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला.
या पाचही जणांचा अपघातापूर्वीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील होते. स्विमिंग पूलमध्ये धम्माल केल्यानंतर घराकडे परत जात असताना अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रफीकनगर माजिदपुरामध्ये राहणारा दानिश आपल्या दोन मुली आणि भावाच्या दोन मुलांना घेऊन फिरायला गेला होता. बुधवारी हे सर्वजण एकाच बाईकवरून मुर्शीदपूर येथील स्विमिंग पूलवर मजा करण्यासाठी गेले होते. याठिकाणी मजामस्ती केल्यानंतर रात्री १० वाजता हे सर्वजण घराकडे परत निघाले होते. पण वाटेत त्यांच्यावर काळाने घाला घातला. मेरठ-बुलंदशहर महामार्गावर चुकीच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली.
या अपघातामध्ये दुचाकीवर असलेल्या पाचही जणांना ट्रकने चिरडले. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या सर्वांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये दानिश (३६ वर्षे), त्याची मुलगी समायरा (५ वर्षे) आणि माहिरा ( ६ वर्षे), भावाची मुलं समर (८ वर्षे) आणि माहिम (८ वर्षे) या सर्वांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta