
राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील रतनगड जवळ बुधवारी दुपारी भारतीय हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान कोसळले. त्यात दोन्ही पायलटचा मृत्यू झाला, अशी पुष्टी भारतीय हवाई दलाने केली आहे. “हवाई दलाच्या जॅग्वार ट्रेनर विमानाला नियमित सरावादरम्यान बुधवारी राजस्थानमधील चुरूजवळ अपघात झाला. या अपघातात दोन्ही पायलट गंभीररित्या जखमी झाले. यात कोणत्याही नागरी मालमत्तेचे नुकसान झालेले नाही,” असे हवाई दलाने जारी केलेल्या एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमान भारतीय वायूदलाचे असल्याचे सांगितले जात आहे. विमान कोसळल्यानंतर त्याचे तुकडे तुकडे झाले. गावानजीकच्या शेतामध्ये हे विमान कोसळले. विमानाच्या तुकड्यांजवळच पालयचा मृतदेह आढळून आला. पायलटच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या अपघाताचा तपास सुरू केला आहे.
विमान कोसळताना मोठा आवाज झाला अशी स्थानिकांनी माहिती दिली. सध्या घटनास्थळावर मोठी गर्दी झाली आहे. विमान कोसळल्यानंतर आग लागली त्यामुळे घटनास्थळावर धुराचे लोट पसरले आहेत. विमान अपघाताची बातमी सगळीकडे पसरताच रतनगडमध्ये एकच खळबळ उडाली.
जिल्हाधिकारी अभिषेक सुराणा आणि स्थानिक पोलिस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. लष्कराचे बचाव पथकही घटनास्थळी पोहचले आहे. जेणेकरून घटनास्थळ सील करता येईल आणि तपास सुरू करता येईल. गावकऱ्यांनी सांगितले की, विमान अपघातानंतर लगेचच शेतात आग लागली. ही आग गावकऱ्यांनी स्वतःहून विझवण्याचा प्रयत्न केला.

Belgaum Varta Belgaum Varta