
नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आरोग्याच्या कारणामुळे पद सोडले असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले की, ‘प्रकृतीला प्राधान्य देण्यासाठी वैद्यकीय सल्ल्याचे पालन करत मी संविधानाच्या कलम 67(अ) नुसार तात्काळ भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे.’

जगदीप धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, ‘मी राष्ट्रपतींचे आभार मानतो, माझ्या कार्यकाळात त्यांनी मला दिलेला पाठिंबा आणि त्यांनी केलेले सहकार्य अभूतपूर्व होते. मी पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचेही मनापासून आभार मानतो. पंतप्रधानांनी दिलेला पाठिंबा अमूल्य होता, माझ्या कार्यकाळात मी खूप काही शिकलो आहे.’
खासदारांचे प्रेम नेहमीच आठवणीत राहील
जगदीप धनखड यांनी आपल्या पत्रात पुढे लिहिले की, संसदेच्या सर्व सदस्यांकडून मला मिळालेले प्रेम आणि विश्वास नेहमीच माझ्या आठवणीत राहील. देशाच्या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मला अनेक अनुभव मिळाले यासाठी मी मनापासून आभारी आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीचा आणि अभूतपूर्व विकासाचे साक्षीदार होणे आणि त्यात सहभागी असणे ही समाधानाची बाब आहे.

जगदीप धनखड यांनी पुढे म्हटले की, या परिवर्तनकारी युगात देशाची सेवा करणे माझ्यासाठी खास सन्मान आहे. हे पद सोडताना, भारताचा जागतिक पातळीवर झालेल्या उदयाचा आणि देशाच्या अभूतपूर्व कामगिरीचा मला अभिमान आहे. भारताचे भविष्य उज्ज्वल असेल असा मला विश्वास आहे. मी मनापासून आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतो.

Belgaum Varta Belgaum Varta