
झालावाड : राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळून ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. झालावाड जिल्ह्यातील पिपलोड गावातील एका सरकारी शाळेत ही धक्कादायक घटना घडली. शाळेमध्ये सकाळी प्रार्थना सुरू असताना अचानक छत कोसळले. या घटनेमुळे खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेचे छत कोसळून ७ मुलांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक मुलं गंभीर जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस, स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जेसीबीच्या मदतीने ढिगारा हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. जखमी मुलांना मनोहरथाना सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात येत आहे. जखमींमधील काही मुलांची प्रकृती गंभीर आहे.
शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे मुले शाळेत आली. शाळेमध्ये सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली. ही घटना घडली त्यावेळी शाळेत प्रार्थना सुरू होती. या शाळेची इमारत खूपच जुनी असल्याची माहिती समोर आली आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शाळेची इमारत ओली आणि जीर्ण झाली होती. आज सकाळी मुले त्यांच्या वर्गात असताना अचानक एका वर्गाचे छत कोसळले. त्यामुळे तिथे बसलेली सर्व मुले ढिगाऱ्याखाली दबली गेली. ही घटना घडताच शाळेत गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शाळेकडे धाव घेतली.
या घटनेनंतर शाळेत आलेल्या मुलांच्या कुटुंबातील सदस्य रडू लागले. आपल्या जखमी झालेल्या मुलांना वाचवण्यासाठी त्यांची देखील धावाधाव सुरू आहे. सध्या जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा काढण्याचे काम सुरू आहे. जखमी मुलांना तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात येत आहे. ज्या मुलांची प्रकृती गंभीर आहे त्यांना पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta