किश्तवाड : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चशोती गावात भीषण ढगफुटी आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झाला. या घटनेत 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जखमींना अठोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बचाव कार्य सुरू
घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलिस आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांसह लष्करी जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून अनेक गावे या पुरामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला स्वतः रेस्क्यू ऑपरेशनवर लक्ष ठेवून आहेत.
हेल्पलाइन आणि नियंत्रण कक्ष
प्रशासनाने पद्दार येथे यात्रेकरूंसाठी नियंत्रण कक्ष आणि सहाय्यता डेस्क उभारला आहे. पाच अधिकाऱ्यांना या कक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. चशोती हे माता मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील शेवटचे गाव आहे, जिथे हजारो भाविक यात्रेसाठी जमले होते.
Belgaum Varta Belgaum Varta