नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनता दरबारात हल्ला झाला आहे. भर कार्यक्रमात एका व्यक्तीने मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली लगावली आहे. या घटनेनंतर दिल्ली आणि देशात एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विरोधकांनी यावरून भाजपवर निशाणा साधलाय. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.
मुख्यमंत्री निवासस्थानावरील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रेखा गुप्ता या जनता दरबारमध्ये उपस्थित होत्या. त्यावेळी एक व्यक्ती तक्रार घेऊन त्यांच्याकडे आला. मुख्यमंत्री त्याचे म्हणणं ऐकत होत्या, त्याचवेळी त्या तरूणाने जोरदार हल्ला केला. त्याने मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कानाखाली चपराक लगावली. त्यानंतर जनता दरबारात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी तात्काळ त्या तरूणाला ताब्यात घेतले असून तपास सुरू केला आहे. दिल्लीचे भाजप प्रवक्ता प्रवीण शंकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारावेळी एक व्यक्ती त्यांच्याकडे आला. त्याने रेखा गुप्ता यांच्याकडे काही कागदपत्रे दिली. त्यानंतर जोरात ओरडला अन् कानाखाली लगावली. नवी दिल्लीच्या भाजप मुख्यमंत्र्यांवर हल्ला करणाऱ्या तरूणाचे वय अंदाजे ३५ वर्षे असल्याची माहिती मिळाली आहे. दिल्लीच्या भाजपकडून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. भाजप नेता रमेश बिधूडी म्हणाले की, मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ल्याचा प्रयत्न जाणूनबुजून केला. जनता कार्यक्रम रद्द करण्यात यावा, त्यासाठी हा हल्ला करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta