नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची चर्चा होती. या निवडणुकीत बहुमत नसतानाही इंडिया आघाडीने आपला उमेदवार उभा केला होता. ही फक्त विजयाची नव्हे तर विचारधारेची लढाई आहे, असे यावेळी विरोधकांकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, या निवडणुकीसाठी आज (9 सप्टेंबर) मतदानाची प्रक्रिया पार पडली. तसेच या निवडणुकीचा निकालही आजच जाहीर करण्यात आला. सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले सीपी राधाकृष्णन यांची देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून घोषणा करण्यात आली आहे.
राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांनी या निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर लगेच मतमोजणी करण्यात आली. यावेळी मतमोजणीनुसार सीपी राधाकृष्णन यांना एकूण 452 पहिल्या पसंतीची मते मिळाली. तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना एकूण 300 पहिल्या पसंतीची मते मिळाली. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एकूण 768 खासदारांनी मतदान केले होते.
विरोधकांची एकजूट दिसली, मतांची टक्केवारी वाढली
दरम्यान, एनडीएने उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली असली तरी निकालानंतर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ट्वीट करत विरोधकांच्या एकतेचे कौतुक केले आहे. या निवडणुकीत विरोधकांनी चांगली एकजूट दाखवली. त्यांची कामगिरी ही कौतुकास्पद आहे. 2022 सालाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांच्या उमेदवाराला फक्त 26 टक्के मते मिळाली होती. या निवडणुकीत मात्र मते 40 टक्क्यांपर्यंत वाढली आहेत, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta