रायपूर : छत्तीसगडमधील रायपूरमध्ये भीषण दुर्घटना घडली. एका खासगी स्टील प्लांटचा काही भाग कोसळला. त्याखाली दबून सहा कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
रायपूरमध्ये एक खासगी स्टील प्लांट आहे. या प्लांटचा काही भाग कोसळला. शुक्रवारी ही दुर्घटना घडली. आतापर्यंत मृतांचा आकडा सहापर्यंत पोहोचला आहे. तर अनेक कामगार जखमी आहेत.
छत्तीसगडची राजधानी शुक्रवारी हळहळली. रायपूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या सिलतारा औद्योगिक क्षेत्रातील गोदावरी इस्पात लिमिटेड या स्टील प्रकल्पात भीषण दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, प्लांटमध्ये दुरुस्ती आणि देखभालीचे काम सुरू होते. ते पूर्ण झाल्यानंतर पाहणी करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांवर प्लांटचा काही भाग कोसळला.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत सहा कामगारांचा दबून मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी आहेत. घटनेनंतर तात्काळ बचावकार्य हाती घेण्यात आले.
दुर्घटनेत जखमी झालेल्यांचा निश्चित आकडा आणि ही घटना कोणत्या कारणानं घडली याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. घटनेनंतर सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रशासनाच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. काही कामगार दबले गेल्याची भीती आहे. मदत आणि बचावकार्य हाती घेण्यात आले असून, ते युद्धपातळीवर सुरू आहे. जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रायपूर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची पथके घटनास्थळी पोहोचली. तात्काळ बचावकार्य हाती घेण्यात आले. या दुर्घटनेनंतर परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. रायपूर जिल्हा प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकारी घटनेचा आढावा घेण्यासाठी प्लांटमध्ये पोहोचले. जखमींना रायपूरच्या जिल्हा आणि मेकाहारा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta