
नवी दिल्ली : १७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणाऱ्या स्वयंघोषित अध्यात्मिक स्वामी चैतन्यानंद सरस्वतीला अखेर अटक करण्यात आली आहे. दिल्लीमधील एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींचे या बाबाने लैंगिक शोषण केले. दिल्ली पोलिसांनी आग्रा येथून स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थ सारथीला अटक केली. दिल्ली पोलिस त्याला घेऊन बसंत कुंज पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. आज त्याला पटियाला हाऊस कोर्टात हजर केले जाणार आहे.
दक्षिण दिल्लीतील शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंटशी संबंधित हे प्रकरण आहे. याठिकाणी शिकणाऱ्या १७ विद्यार्थिनींनी स्वामी चैतन्यानंद सरस्वतीवर गंभीर आरोप केले होते. विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, स्वामी चैतन्यानंद सरस्वतीने ग्रेड कमी करण्याची धमकी देऊन त्यांना ब्लॅकमेल के. तो रात्री उशिरा मुलींना त्याच्या खोलीत बोलावत असे आणि स्वत:ला इंटरनॅशनल व्यक्ती असल्याचे सांगत चांगल्या प्लेसमेंटचे आमिष दाखवत असे. विद्यार्थिनींना धमकी देखील दिली जात होती. या घृणास्पद कृत्याचा पर्दाफाश झाल्याने संस्थेत खळबळ उडाली.
पीडित विद्यार्थिनींच्या तक्रारींवरून ४ ऑगस्ट रोजी दिल्लीतील बसंत कुंज पोलिस ठाण्यात स्वामी चैतन्यानंद सरस्वतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या तपासानंतर आरोपीला अखेर आग्रा येथून अटक करण्यात आली. त्याची आज वैद्यकिय तपासणी केली जाईल. त्यानंतर त्याला पटियाला हाऊस कोर्टात हजर केले जाणार आहे. पोलिस आता त्याची चौकशी करत आहेत आणि तपास जसजसा पुढे जाईल तसतसे आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी सांगितले की, स्वामी चैतन्यानंद सरस्वतीला पहाटे ३.३० वाजता अटक करण्यात आली. त्याला आग्रा येथील ताज गंजमधील हॉटेल फर्स्टमधून अटक करण्यात आली. या हॉटेलच्या रुम नंबर १०१ मध्ये तो लपून बसला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अनेक विद्यार्थिनींनी श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंटचे संचालक स्वामी चैतन्यानंद सरस्वतीकडून झालेल्या छळाच्या भयानक कहाण्या सांगितल्या.
Belgaum Varta Belgaum Varta