

मुंबई : अंमली पदार्थ विरोध पथक (एएनटीएफ) आणि राजस्थान दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) या दोन संस्थांनी संयुक्त कारवाईत अंमली पदार्थांची तस्करी प्रकरणातील प्रमुख आरोपी बजरंग सिंगला अटक केली. बजरंग सिंग हा राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच एनएसजी कमांडो होता. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान तो मुंबईतील ताज हॉटेलमध्ये केलेल्या एनएसजीच्या कारवाईत तो सहभागी झाला होता. बजरंग हा ओडिशा आणि तेलंगणा येथून गांजा आणून राजस्थानमध्ये त्याचे नेटवर्क चालवत होता. त्याच्यावर २५,००० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
पोलीस पकडू नये यासाठी बजरंग मोबाईल फोन फार कमी प्रमाणात वापरत असे. तो एका ठिकाणी जास्त वेळ थांबत नसे. अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर राजस्थानच्या एटीएसने त्याला अटक केली. कारवाईदरम्यान त्याच्याकडून २०० किलो गांजा जप्त करण्यात आला. बजरंगचा निर्भड स्वभाव आणि ओडिशा-तेलंगणा राज्यातील संपर्कांमुळे त्याने राजस्थानमध्ये नेटवर्क तयार केले होते, अशी माहिती आयजी विकास कुमार यांनी दिली.
विकास कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बजरंगने छोट्या व्यवहारांपासून ते क्विंटल आकाराच्या अंमली पदार्थाची तस्करी केली. त्याची अटक ही अंमली पदार्थांविरुद्ध सुरु असलेल्या मोहिमेसाठी महत्त्वाची घटना आङे. अटकेमुळे राजस्थानमधील गांजाच्या तस्करीचे नेटवर्क उद्ध्वस्त होण्यास मदत होईल. बजरंग सिंगची कहाणी धक्कादायक आहे. बीएसएफमध्ये सामील होण्यासाठी त्याने शिक्षण सोडले. कुस्तीगीरासारखी शरीरयष्टी आणि लढाऊ वृत्तीमुळे तो एनएसजी कमांडो बनला.
बजरंगने सात वर्षे दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये भाग घेतला होता. २००८ च्या २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान एनएसजीच्या ताज हॉटेल ऑपरेशनमध्ये तो सहभागी होता. २०२१ मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर तो गुन्हेगारीकडे वळला. गावी परतल्यानंतर त्याने राजकारणात प्रवेश केला. पण त्याचा हा प्रयत्न फसला. त्यानंतर बजरंगने त्याच्या पत्नीला गावप्रमुख म्हणून उभे केले. यादरम्यान तो गुन्हेगारांशी जोडला गेला, अशी माहिती आयजी विकास कुमार यांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta