

पणजी : दोन वेळा माजी मुख्यमंत्री राहिलेले कृषी मंत्री रवी नाईक यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. रवि नाईक यांनी ७९ व्या अखेरचा श्वास घेतला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्री रवी नाईक यांच्या निधनाची माहिती दिली. रवी नाईक यांच्या निधनाने गोव्यावर शोककळा पसरली असून कार्यकर्ते शोकसागरात बुडाले आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रवि नाईक यांच्या निधानानंतर श्रध्दांजली अर्पण केली. रवी नाईक यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, सुना आणि तीन नातवंडे असा परिवार आहे.
रवी नाईक यांना बुधवारी पहाटे हृदयविकाराचा झटका आला. त्यांना घरातून तात्काळ पोंडा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारावेळीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर रवी नाईक यांचे पार्थिव पोंडा येथील निवासस्थानी हलविण्यात आले. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन देण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. नाईक यांच्या जाण्याने गोव्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया राजकीय विश्लेषकांकडून येत आहेत.
रवी नाईक यांच्या निधनानंतर गोवा राज्यावर तीन दिवसांचा राजकीय शोक मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केला. ते म्हणाले की, “गोव्याच्या राजकारणातील एक दिग्गज नेते, मुख्यमंत्री आणि विविध खात्यांमध्ये मंत्री म्हणून त्यांनी दशकांपासून केलेल्या समर्पित सेवेने राज्याच्या प्रशासनावर आणि लोकांवर छाप सोडली आहे.”
राजकीय प्रवास कसा राहिला ?
कुल आणि मुंडकरांना अधिकार देण्याच्या चळवळीसाठी रवी नाईक यांना गोव्यात ओळखलं जाते. गोव्यातील तिसऱ्या जिल्ह्याची कल्पना मांडणारे नाईक पहिले आमदार होते. रवी नाईक यांनी १९९१ मध्ये गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता. नगरसेवक ते मुख्यमंत्री असा रवी नाईक यांनी राजकीय प्रवास केला. १९८४ मध्ये रवी नाईक पहिल्यांदाच एमजीपीच्या तिकिटावर फोंडा मतदारसंघातून आमदार झाले. १९९८ मध्ये ते उत्तर गोव्याचे काँग्रेस खासदारही होते. २००० मध्ये रवी नाईक भाजपमध्ये सामील झाले होते. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणूनही काम पाहिले. २००२ मध्ये नाईक यांनी काँग्रेसमधये प्रवेश केला होता. २००७ मध्ये त्यांनी दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून काम केले. २०२१ मध्ये ते दुसऱ्यांदा भाजपमध्ये सामील झाले. २०२२ ची विधानसभा निवडणूक त्यांनी फोंडा येथून भाजपच्या तिकिटावर लढवली आणि पहिल्यांदाच भाजपसाठी जागा मिळवली. नंतर सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ देण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta