
श्रीकाकुलम : आंध्रप्रदेश राज्यातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात शनिवारी एकादशीच्या दिवशी मोठी चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असून अनेक भाविक गंभीर जखमी झाले आहे. आता प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कार्तिक महिन्याच्या निमित्ताने मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक जमा झाले होते. गर्दी इतकी वाढली की प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापनच्या परिस्थितीच्या हाताबाहेर ही परिस्थिति गेली.
जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे आणि काही जणांची प्रकृती ही गंभीर असल्याने मृतांचा आकडा हा वाढू शकतो असे सांगण्यात येत आहे. नेमकी ही गर्दी अचानक कशी वाढली आणि चेंगराचेंगरीचे कारण माहिती करण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. आता जो व्हिडिओ समोर आला आहे त्यामध्ये आज झालेल्या चेंगराचेंगरीत भाविक कोसळताना दिसत आहे. अक्षरशः तुडवले जात असल्याचे दिसून येत आहे. आज सकाळी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक हे मंदिरात जमले असताना मोठा गोंधळ निर्माण झाला आणि यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे.
आंध्र प्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एकादशीच्या निमित्ताने मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे ही दुर्घटना घडली. पोलीस आणि प्रशासनाच्या पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
राज्याचे कृषी मंत्री के. अचन्नायडू यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मंदिर आणि प्रशासनिक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी बचाव आणि मदतकार्याची पाहणी करत घटनेची सविस्तर माहिती घेतली. मंत्र्यांनी आश्वासन दिले की, राज्य सरकार सर्व जखमींना योग्य आणि तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध करून देईल तसेच या घटनेची सखोल चौकशी केली जाईल. सध्या अतिरिक्त पोलीस दल घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta