

मुंबई : बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग विरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), २००२ अंतर्गत अनेक सेलिब्रेटींची तब्बल ७.९३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. कारवाई झालेल्यांमध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेला, अभिनेता सोनू सूद, अनुष्का हाजरा, अभिनेत्री नेहा शर्मा, माजी क्रिकेटपटू युवराज सिंग, रॉबिन उथप्पा, आणि मिमी चक्रवर्ती यासह अनेक प्रसिद्ध सेलिब्रेटींचा समावेश आङे..
विविध राज्यांमधील पोलीस यंत्रणांनी बेकायदेशीर ऑफशोअर बेटिंग प्लॅटफॉर्म 1xBet च्या ऑपरेटर्सविरोधात नोंदवलेल्या अनेक एफआयआरच्या आधारे सुरू करण्यात तपासानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, हा प्लॅटफॉर्म त्यांच्या 1xBat आणि 1xbat Sporting Lines सारख्या सरोगेट ब्रँड्सचा वापर करून, संपूर्ण भारतात बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग आणि जुगाराला प्रोत्साहन देणे आणि बेटिंगसाठी सुविधा पुरवण्याचे काम करत होता.
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला, अभिनेता सोनू सूद, नेहा शर्मा, मिमी चक्रवर्ती आणि अंकुश हाजरा, तसेच माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा हे आता ऑफशोर बेटिंग प्लॅटफॉर्मचे सेलिब्रिटीकडून केले जाणारे ब्रँड एंडोर्समेंट या प्रकरणात ईडीच्या रडारावर आले आहेत.
ईडीच्या तपासात माहिती समोर आली आहे की, या सेलिब्रिटींनी माहिती असून देखील सरोगेट ब्रँडिंगच्या माध्यमातून 1xBet चे प्रमोशन करण्यासाठी विदेशी कंपन्यांबरोबर एंडोर्समेंट करार केले होते.
या प्लॅटफॉर्मकडे भारतात व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेला कसलाही परवाना नसताना देखील कथितपणे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून, ऑनलाईन व्हिडीओ आणि प्रिंट जाहिरातींच्या माध्यमातून प्रमोशन केले गेले.
ईडी अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, या एंडोर्समेंटचे पेमेंट परकीय मध्यस्थांच्या आणि बेकायदेशीर पैशांचा उगम कुठे आहे हे लक्षात येऊ नये म्हणून ‘लेयर्ड’ व्यवहारांच्या माध्यमातून करण्यात आले.
या प्रकरणात बड्या नावांची चौकशी केली जात असल्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी याच प्रकरणाच्या तपासादरम्यान ६ ऑक्टोबर २०२५ रोजी ईडीने माजी क्रिकेटपटू शिखर धवन आणि सुरेश रैना यांची ११.१४ कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली होती.


Belgaum Varta Belgaum Varta