नवी दिल्ली : अमेरिका-इस्रायल-इराण संघर्ष बाराव्या दिवशी पोहोचला असून या तणावाचा परिणाम समुद्री वाहतुकीवरही दिसू लागला आहे. व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यात दोन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये दोन भारतीय नागरिकांनी प्राण गमावले आहेत, तर एक जण अजूनही बेपत्ता आहे.
२८ भारतीय व्यापारी जहाजे अडकली
भारताच्या बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या पर्शियन आखातात २८ भारतीय व्यापारी जहाजे असून त्यावर एकूण ७७८ भारतीय खलाशी कार्यरत आहेत.
१ कोटी भारतीयांचे वास्तव्य
या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर भारतीय प्रवासी समुदाय असल्याने त्यांच्या सुरक्षिततेला सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, असे जयस्वाल यांनी सांगितले. गल्फ सहकार्य परिषदेच्या (GCC) देशांमध्ये सुमारे १ कोटी भारतीय वास्तव्यास असल्याचेही त्यांनी नमूद केले.
इस्रायलमध्येही एक भारतीय जखमी
जयशंकर यांनी सांगितले की व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांमुळे दोन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे. या घटनेबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले. याशिवाय, इस्रायलमध्ये एक भारतीय जखमी झाला असून दुबईमध्येही एका भारतीयाला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. परराष्ट्र मंत्रालय या सर्व नागरिकांच्या संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
Belgaum Varta Belgaum Varta