कटक : ओडिशामध्ये मोठी दुर्घटना घडली. हॉस्पिटलला आग लागल्यामुळे १० जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना ओडिशाच्या कटकमध्ये घडली. सोमवारी मध्यरात्री एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलला अचानक आग लागली. या आगीमध्ये अनेक जण जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आग कशी लागली यामागचे कारण शोधले जात आहे. तर शॉर्ट सर्किटमुळे हॉस्पिटलला आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये लागलेल्या आगीमध्ये १० रुग्णांचा मृत्यू झाला. तर ५ रुग्ण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमी रुग्णांवर याच हॉस्पिटलच्या दुसऱ्या बिल्डिंगमध्ये उपचार सुरू आहेत. जखमी रुग्णांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री मोहन मांझी हॉस्पिटलमध्ये पोहचले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मध्यरात्री अडीच ते तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. तर अधिकाऱ्यांनी सांगितले की, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर सपोर्टवर असलेल्या रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला.
ओडिशाचे मुख्यमंत्री कार्यालय सांगिलतले की, ‘एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या ट्रॉमा केअर आयसीयूमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्दैवी घटनेबद्दल मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तर या घटनेत जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवून त्यांच्यावर कोणत्याही व्यतयाशिवाय उपचार करण्यात यावे असे आदेश दिले.
दरम्यान, मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडून २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. मुख्यमंत्र्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांचीही भेट घेतली आणि त्यांना पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी आरोग्य विभाग आणि रुग्णालयातील अधिकाऱ्यांना सर्व जखमी आणि बाधित रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्याचे निर्देश दिले.
Belgaum Varta Belgaum Varta