नवी दिल्ली : ज्ञानवापीसंदर्भात सगळ्यात मोठी बातमी हाती आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी आता जिल्हा न्यायालय करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून ज्ञानवापीचा खटला हस्तांतरित करण्यात आलाय. हे प्रकरण प्रथम जिल्हा न्यायालयाकडे हस्तांतरित करण्यात आलंय. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी आता जिल्हा न्यायाधीश करणार आहेत. तर सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी मशीद प्रकरणी तीन पर्याय ठेवले आहेत. वाराणसी कोर्टाला सुनावणी पूर्ण करु द्या, सुनावणीपर्यंत कोर्ट अंतिम आदेश देऊ शकतं तसेच निर्णय येईपर्यंत अंतरिम आदेश लागू असेल, असे तीन पर्याय सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
ज्ञानवापी मशिदीच्या केसने देशातील वातावरण तापलं आहे. त्यावरच आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी मशीद प्रकरण जिल्हा न्यायाधीशांकडे वर्ग केले आहे. दरम्यान, वाराणसी न्यायालयाचा निर्णय अवैध ठरवा, अशी मागणी करणारी याचिका मुस्लिम पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. सुनावणीदरम्यान मुस्लिम पक्षकारांनी हिंदू पक्षकारांवर आरोप केले. हिंदू पक्षकारांकडून वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. 500 वर्षांपासून प्रचलित असलेली धार्मिक पद्धत बदलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मुस्लिम पक्षकारांनी केला.
ज्ञानवापी मशिदीच्या सुनावणीतील मुद्दे
वाराणसी न्यायालयाला सुनावणी पूर्ण करु द्या-पहिला पर्याय
सुनावणीपर्यंत न्यायालय अंतिम आदेश देऊ शकतं-दुसरा पर्याय
निर्णय येईपर्यंत अंतरिम आदेश लागू असेल-तिसरा पर्याय
मुस्लिम पक्षकारांचे आरोप
वाराणसी न्यायालयाच्या निर्णयाला अवैध घोषित करा
हिंदू पक्षाने वातावरण निर्मिती केली
वाराणसी कोर्टाचा निर्णय वातावरण खराब करणारा
500 वर्षे जुन्या परिस्थितीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न
सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं?
मुस्लिमांना नमाज अदा करण्यासाठी सवलत द्या.
दावा केलेल्या शिवलिंग परिसराची सुरक्षा केली.
सर्व्हे केलेला रिपोर्ट सार्वजनिक व्हायला नको.
सर्व्हे केलेला रिपोर्ट फक्त न्यायाधीशांसमोर यायला हवा.
आमचा आदेश अंतरिम राहू शकतो.
आम्हाला समाजात संतुलन ठेवायचं आहे.