नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलची किंमत आता स्वस्त झाले आहेत. पेट्रोल ८ रुपयांनी तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठी दिलासा मिळाला आहे. आता केंद्रा पाठोपाठ राज्यांनींही पेट्रोल आणि डिझेलवरचा कर कमी करावी अशी अपेक्षा केंद्र सरकारने व्यक्त केली आहे.
एकीकडे महागाईमुळे सामान्य जनता होरपळली जात असताना केंद्राने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. पेट्रोलवरील केंद्रीय अबकारी कर हा ८ रुपयांनी तर डिझेलवरील अबकारी कर हा ६ रुपयांनी कमी करण्यात येत आहे. त्यामुळे पेट्रोलच्या किमतीमध्ये ८ रुपये तर डिझेलच्या किमतीमध्ये ७ रुपयांची घट होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही घोषणा केली आहे.
मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात ३ रुपयांनी वाढ, एक किलो सीएनजीसाठी मोजावे लागणार ८६ रुपये
गेल्या दोन वर्षामध्ये कोरोनामुळे झालेली बिकट अवस्था, रशिया युक्रेन युद्धामुळे जागतिक स्तरावर वाढलेली महागाई या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.
या आधीही केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय अबकारी कर कमी केला होता, त्यावेळी भाजप शासित राज्यांनीही करामध्ये कपात केली होती. आता केंद्राने दुसऱ्यांदा कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर राज्य सरकारं आता कोणती भूमिका घेणार, राज्यांतील कर कमी करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
घरगुती सिलेंडरच्या दरात २०० रुपयांची घट
सर्वसामान्यांना दिलासा देणारा आणखी एक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. १२ सिलेंडरपर्यंत २०० रुपये प्रति सिलेंडर अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे ९ कोटी उज्ज्वला योजना धारकांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे केंद्राला दरवर्षी जवळपास सहा हजार कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. हा निर्णय तातडीने घेण्यात आला आहे.