नवी दिल्ली : जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे बुधवारी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दर वाढविले जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळात जागतिक बाजारात इंधनाचे भाव कडाडल्याने गॅस सिलिंडरची दरवाढ अटळ असल्याचे मानले जात आहे. नेमकी किती दरवाढ होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
तेल कंपन्यांकडून 7 मे रोजी 14.2 किलो वजनाच्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दर 50 रुपयांनी वाढविण्यात आले होते. त्यावेळी गॅस सिलेंडरचे दर 999.50 रुपयांवर गेले होते. यानंतर 19 मे रोजी पुन्हा 3.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. यामुळे सिलिंडर दर एक हजार रुपयांच्या पुढे गेले होते.
19 मे रोजी घरगुती गॅसबरोबर व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ करण्यात आली होती. जून महिन्यात सिलिंडर दरात वाढ करण्यात आली तर, सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसणार आहे. इंधन दरात वाढ झाली तर महागाईला चालना मिळते. त्यामुळे महागाईला आगामी काळात आणखी फोडणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Belgaum Varta Belgaum Varta