चेन्नई : तामिळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष अण्णाद्रमुकचे नेते ओ. पन्नीरसेल्वम आणि ई. पलानीस्वामी यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. पक्षातील वर्चस्व वादातून दोन्ही नेत्यांचे गट आमने-सामने आले. यावेळी पनीरसेल्वम समर्थकांकडून पक्षाच्या मुख्यालयात तोडफोड करण्यात आली. आपल्याविराेधात करण्यात आलेल्या कारवाईविराेधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे पनीरसेल्वम यांनी स्पष्ट केले आहे.
पनीरसेल्वम यांचे पक्षातील प्राथमिक सदस्यत्व रद्द
पक्षाचे नेतृत्व एकहाती राहावे यासाठी ओ. पन्नीरसेल्वम आणि ई. पलानीस्वामी यांच्यातील संघर्ष वाढला आहे. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांची याचिका आज मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळली. यानंतर पलानीस्वामी यांच्याअध्यक्षतेखालील बैठकी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पनीरसेल्वम यांच्या अन्य काही नेत्यांची पक्षातील प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. तसेच पक्षातील समन्वयक आणि संयुक्त समन्वयक ही पद रद्द करण्यात आली आहेत. यानंतर अण्णाद्रमुकच्या अंतरिम महासचिवपदी पलानीस्वामी यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच पेरियार, एमजी रामचंद्रन आणि जयललिता यांना भारतरत्न देण्यात यावा, या मागणीसह १६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
पनीरसेल्वम समर्थकांकडून कार्यालयाची तोडफोड
पनीरसेल्वम यांना पदासह पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांनी अण्णाद्रमुक कार्यालयाची तोडफोड देत जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, पनीरसेल्वम यांच्याकडून सत्ताधारी द्रमुक पक्षाशी जवळीक वाढली आहे. त्यांच्याकडून द्रमुक सरकारचे समर्थन केले जात असल्यानेच त्यांना पक्षात हटविण्याचा निर्णय झाल्याचे अण्णाद्रमुकचे ज्येष्ठ नेते के. पी. मुनुसामी यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta