पणजी : गोव्यातील ११ काँग्रेस आमदारांपैकी ८ जण फुटण्याची काही दिवसांपूर्वी चर्चा झाली होती. त्यावर पडदा पडतो न पडतो तोच आता पुन्हा काँग्रेसचे आमदार फुटण्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने आठ आमदार फुटू नयेत यासाठी आपल्या पाच आमदारांना चेन्नई येथे पाठवले आहे.
मार्च २०२२ मध्ये झालेल्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला २० तर काँग्रेसला ११ जागा मिळाल्या. इतर लहान पक्ष व ३ अपक्ष निवडून आलेले आहेत. तीन अपक्षांसह मगो पक्षाच्या दोन आमदारानी भाजपला पाठिंबा दिला आहे. ४० आमदारांच्या विधानसभेत भाजपकडे २५ आमदारांचे संख्याबळ आहे. गेल्या दहा वर्षे सत्तेशिवाय राहिलेल्या काँग्रेस आमदारांना आता पुन्हा पाच वर्षे सत्तेबाहेर राहावे लागणार असल्यामुळे काळजी लागलेली आहे. त्यामुळे ते स्वतःहून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि विरोधी पक्षनेते राहिलेले मायकल लोबो यांनी या दोन तृतीयांश आमदारांना फोडण्याचा तयारी केल्याचा दावा केला. काँग्रेसने या दोन्ही आमदारांना अपात्र करण्याची मागणी सभापतीकडे केली आहे. अद्यापही सभापतींनी आपला निवाडा दिलेला नाही. मायकल लोबो यांच्यासोबत त्यांच्या पत्नी डिलायला लोबो आणि अन्य दोन आमदार आहेत.
काँग्रेसच्या आज चेन्नई येथे गेलेल्या पाच आमदारांमध्ये रूडाल्फ फर्नांडिस, ऍड. कार्लुस फेरेरा, संकल्प आमोणकर, एल्टन डी कॉस्ता व युरी आलेमाव यांचा समावेश आहे. मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांच्या गळाला आठ आमदार लागू नयेत, यासाठी या पाच आमदारांना चेन्नईला हलवण्यात आले आहे.
सध्या गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. शनिवार व रविवारी अधिवेशनाला सुट्टी असते. सोमवारपासून पुन्हा अधिवेशन सुरू होईल. त्याच दिवशी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. चेन्नई येथून या पाच आमदारांना सोमवारी थेट विधानसभेत आणण्यात येणार असल्याचे कळते. त्या पाच आमदारांचा संपर्क दिगंबर कामत किंवा मायकल लोबो यांच्याशी होऊ नये यासाठी काँग्रेसने त्या आमदारांना चेन्नई पोहोचलेले आहे. मदार फुटले नाहीत तर जी आठसंख्या फुटीसाठी हवी ती उपलब्ध होणार नाही आणि पक्ष एकसंध राहील असा दावा काँग्रेसतर्फे येत आहे.