पणजी : माजी मुख्यमंत्री, माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत यांची पक्षाच्या कायम स्वरूपी निमंत्रक पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका कामत यांच्यावर ठेवण्यात आला आहे. काँग्रेस आमदारांना भाजपमध्ये नेण्यासाठी दबाव आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दिगंबर कामत यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी करणारे पत्र प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी विधानसभा सभापती यांना यापूर्वीच दिले आहे.
पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत पक्षाने आमदार मायकल लोबो यांची गेल्या रविवारी विरोधी पक्ष नेतेपदावरून हकालपट्टी केली होती. गेल्या रविवारी कॉग्रेस अंतर्गत कलह उफाळून आला होता. मात्र पक्षांतरासाठी आवश्यक आमदार संख्या समीकरण न जुळल्याने बंड फसलं होते. राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष फुटीच्या भीतीने सावध काँग्रेसने आपले 5 आमदार शनिवारी गोवा बाहेर हलवले आहेत.
चेन्नईला गेलेल्या काँग्रेसच्या पाच आमदारांमुळे सध्या काँग्रेस फुटीचा प्रयत्न थांबला असल्याचं बोललं जात आहे. कारण, 11 आमदारांपैकी सध्या सहा आमदार गोव्यात आहेत. तर दबाव टाळण्यासाठी 5 आमदार चेन्नईला गेले आहेत. गोव्यात असलेले सहाही आमदार भाजपमध्ये जाण्यासाठी तयार असून केवळ चेन्नईला गेलेल्या पाच आमदारांमुळे काँग्रेसमधील फुट पुढे गेल्याची माहिती आहे. याच वेळी काँग्रेसनं विरोधी पक्ष नेते पदावरून हकालपट्टी केल्यानंतर मालकल लोबो यांनी गुरुवारी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा गोव्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण, आपण प्रकृतीच्या कारणास्तव अधिवेशनाला गैरहजर राहिल्याचं लोबो यांचं म्हणणं आहे. असं असलं तरी गोवा विमानतळावर मात्र मायकल बोलो प्रसारमाध्यमांच्या कॅमेरामध्ये कैद झाले. यावेळी त्यांनी मी कामानिमित्त बाहेर गेलो होतो असं उत्तर दिले. त्यामुळे काँग्रेसमधील बंड सध्या थंड झाल्याची चर्चा असली तरी वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. दरम्यान, चेन्नईला गेलेले पाच आमदार काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे. कारण, काँग्रेसमधील बंड किंवा फुट या पाच आमदारांच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहे.तर, राष्ट्रपती निवडणुकीसाठी काँग्रेसचे पाचही आमदार गोव्यात परतणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे.