मुंबई : राष्ट्रपतीपदासाठी सोमवारी (ता. १८) निवडणूक होणार आहे. एनडीएने आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. तर यूपीएने यशवंत सिन्हा यांना उभे केले आहे. महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर शिवसेना मुर्मू आणि सिन्हा यांच्यापैकी कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अनेक घडामोडीनंतर शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. आता उपराष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांचे मोठे विधान आले आहे.
एकनाथ शिंदे गटाने बंड केल्याने शिवसेनेचे आमदार फुटले. यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांनी सर्व विरोधी पक्षांना यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. तर शिवसेनेच्या खासदाराने उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्यास सांगितले होते.
खासदाराने उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत सर्वांना द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्यास सांगावे, असे म्हटले होते. यामुळे सर्वांच्या नजरा शिवसेनेच्या निर्णयाकडे लागल्या होत्या. यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्या खासदाराची भेट घेतली होती. यानंतर शिवसेना एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मुर्मू यांना विजय होणार असल्याचे मानले जात आहे. शनिवारी रात्री भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी उपराष्ट्रपतीपदासाठी बहुचर्चित राज्यपाल जगदीप धनकड यांनी उमेदवारी दिली होती. यानंतर रविवारी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत मार्गारेट अल्वा यांना उमेदवार घोषित करण्यात आले. यावेळी त्यांच्याकडून १७ पक्षाचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले. यात शिवसेनेचेही नाव होते. मात्र, शिवसेनेकडून अधिकृत भाष्य करण्यात आले नव्हते.
आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत भाष्य केले आहे. ‘द्रौपदी मुर्मू या आदिवासी महिला आहे. देशातील आदिवासींबद्दल भावना आहे. आमचे अनेक आमदार-खासदारही आदिवासी समाजातील आहेत. त्यामुळेच आम्ही मुर्मू यांना पाठिंबा दिला. मात्र, उपराष्ट्रपतीपदासाठी आमचा पाठिंबा मार्गारेट अल्वा यांना असेल. एएनआयशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले. यावरून शिवसेनेच्या दोन वेगवेगळ्या भूमिका असल्याचे दिसून येत आहे.
उमेदवार पाहून पाठिंबा दिला, दबावात नाही शिवसेनेच्या खासदारांना दबाव टाकल्यामुळे आम्ही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला असे काही नाही. आम्ही काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटील यांनाही पाठिंबा दिला होता. तसेच काँग्रेसचे प्रणव मुखर्जी यांनाही पाठिंबा दिला होता. आम्ही उमेदवार पाहून पाठिंबा दिला आहे. कोणाच्याही दबावात नाही, असे संजय राऊत नागपुरात म्हणाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta