सिवान : बिहारमधील सिवान जिल्ह्यातील बाबा महेंद्रनाथ शिव मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत दोन महिलांचा मृत्यू झाला. सोमवारी झालेल्या अपघातात इतर भाविक जखमी झाले आहेत. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेनंतर मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लिलावती देवी (42, रा. हुसैनगंज ब्लॉकच्या प्रतापपूर गाव) व सुहागमती देवी (40, रा. जिरवी ब्लॉकच्या पाथर गाव) अशी मृत महिलांची नावे आहेत.
बाबा महेंद्रनाथ धाम मंदिरात जलाभिषेकादरम्यान ही घटना घडली. मंदिरात कोरोनानंतर पहिल्यांदाच श्रावण सोमवारी पहाटेपासूनच मोठी गर्दी झाली होती. शिवलिंगावर जलाभिषेक करण्यासाठी बाचाबाची झाली आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांनी श्रावण महिन्यात मंदिर भाविकांसाठी उघडण्यात आले आहे.
भाविकांच्या गर्दीत काही महिला जमिनीवर पडल्या आणि त्यांना उठण्याची संधीही मिळाली नाही, असे सांगण्यात येत आहे. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. शिवकुमारी देवी (रा. हुसेनगंज ब्लॉकच्या सहदुल्लेपूर गाव) व अंजुरिया देवी (हुसैनगंज ब्लॉकच्या प्रतापपूर गावा) अशी जखमी महिलांची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.