नवी दिल्ली : मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणार्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज 22 जुलैला करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अजय देवगणची घोषणा करण्यात आली. याशिवाय मराठी विभागात ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारांसाठी दरवर्षी हिंदीसह, मराठी, कन्नड, मणिपुरी, पंजाबी, तमिळ, तेलुगू, छत्तीसगढ़ी, हरियाणवी या भाषांसह इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना नामांकन दिली जातात.
चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणार्या कलाकारांना भारत सरकारकडून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. या पुरस्कारांची सुरुवात 1954 साली करण्यात आली होती. त्यासाठी जानेवारी 1953 ते डिसेंबर 1953 या कालावधीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची निवड करण्यात आली होती. यावेळी पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ‘शामची आई’ या मराठी चित्रपटाला देण्यात आला होता. दरम्यान यंदाच्या पुरस्कारांमध्ये कोणकोणते कलाकार किंवा चित्रपट बाजी मारणार याविषयी खूप उत्सुकता आहे.