कटिहार : आपल्या घरात आपल्यासमवेत आणखी कोण अनाहूत पाहुणे राहतात याची काही वेळा आपल्यालाही कल्पना नसते. बिहारच्या कटिहारमधील बिजुरिया गावातील मोहम्मद आफताब यांच्याबाबतही असेच घडले. त्यांच्या घराच्या अंगणात तब्बल 40 साप होते व त्याची त्यांना कल्पनाही नव्हती. कुटुंबातील एका मुलीचा बळी गेल्यावर ही बाब समोर आली!
आफताब यांची पाच वर्षांची मुलगी तमन्ना घराच्या अंगणात खेळत असताना तिला सर्पदंश झाला व नंतर तिचा मृत्यू झाला. हा साप घरात किंवा अंगणातच कुठे तरी लपलेला असणार असा कुटुंबाला संशय आला. त्यामुळे आफताब यांनी एका सर्पमित्राला या सापाचा शोध घेण्यासाठी बोलावले. या सर्पमित्राला अंगणात एक-दोन नव्हे तर 40 विषारी साप सापडले.
इतके साप पाहून हा सर्पमित्रही थक्क झाला व आफताब यांच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली! यानंतर सर्पमित्राने अत्यंत सावधगिरीने एक एक करून सर्व विषारी सर्प पकडले आणि त्यांना गोण्यांमध्ये बंद केले. दरम्यान, वन विभागाला या घटनेची माहिती देण्यात आली व हे 40 सापही वन विभागाला सुपूर्द करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta