जीनिव्हा : कोरोनानंतर जगभरात चिंतेचा विषय ठरलेला मंकीपॉक्स हा साथरोग प्रकारातील आजार जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्ल्यूएचओ) जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आला आहे. सध्या जगभरात मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन समितीची दुसरी बैठक नुकतीच पार पडली. त्यात यावर विस्तृत चर्चा झाली होती. अखेर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा विषाणू घातक असल्याचे स्पष्ट करीत डब्ल्यूएचओने शनिवारी जागतिक आणीबाणीची घोषणा करीत सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जगभरात मंकीपॉक्सचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंत जवळपास 75 देशांत मंकीपॉक्सच्या 16 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून यामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रॉस घे्रबेयेसस यांनी दिली. युरोप वगळता जगभरात या विषाणूचा धोका मध्यम स्वरूपाचा असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. युरोपातील उद्रेक हा डब्ल्यूएचओकडून उच्च जोखमीचा मानला जात आहे.
दरम्यान, 2007 पासून डब्ल्यूएचओने जाहीर केलेली ही सातवी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी ठरली असून, भारतातही मंकीपॉक्सचे तीन रुग्ण आढळून आले आहेत.
अमेरिकेत ‘मंकीपॉक्स’चे दोन रुग्ण
अमेरिकेत पहिल्यांदाच ‘मंकीपॉक्स’ रुग्ण सापडले आहेत. दोन मुलांना त्याचा संसर्ग झाला आहे. यातील एक मुलगा कॅलिफोर्नियातील आहे, तर दुसर्या एका नवजात मुलाला ‘मंकीपॉक्स’ची लागण झाली आहे. उपचारानंतर या दोन्ही मुलांची प्रकृती स्थिर आहे. जगातील 80 देशांमध्ये ‘मंकीपॉक्स’ पसरला आहे.