नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीत विजय प्राप्त केलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू सोमवारी (दि. २५) पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे मुर्मू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सकाळी सव्वादहा वाजता मुर्मू यांच्या शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे.
मावळते उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह बहुतांश केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, प्रमुख देशांचे राजदूत, संसद सदस्य, लष्करी अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर शपथविधीच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि द्रौपदी मुर्मू यांचे सकाळी दहाच्या सुमारास संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आगमन होईल. त्यानंतर सरन्यायाधीश रमणा हे मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची शपथ देतील.
मुर्मू यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांना २१ तोफांची सलामी देण्यात येईल. यानंतर मुर्मू यांचे भाषण होणार आहे. शपथविधीचा कार्यक्रम झाल्यानंतर नवीन राष्ट्रपती मुर्मू या राष्ट्रपती भवनात जातील. या ठिकाणी त्यांना इंटर सर्व्हिसेस गार्डकडून सलामी देण्यात येईल. मुर्मू यांच्या शपथविधीचा कार्यक्रम पाहण्यासाठी ओडिशाहून त्यांचे बंधू तरणीसेन टुडू आणि त्यांच्या पत्नी सुकरी टुडू दिल्लीला येणार आहेत. मुर्मू यांचे उपारबेदा नावाचे गाव मयूरभंज जिल्ह्यात आहे.