नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दुसऱ्यांदा ईडी चौकशी केली जाणार आहे. काँग्रेसकडून देशभर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. तर मुंबईतही मंत्रालयाजवळच्या गांधी पुतळ्यासमोर काँग्रेसकडून सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, आज सोनिया गांधींची दुसऱ्यांदा ईडी चौकशी केली जाणार आहे. यापूर्वी ईडीनं गुरुवारी (21 जुलै) सोनिया गांधी यांची चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना सोमवारी म्हणजेच, 25 जुलै रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावलं होतं. पण पुन्हा नव्यानं समन्स बजावत 25 ऐवजी 26 जुलैला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.
नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी (21 जुलै) सोनिया गांधी यांची चौकशी केली होती. ही चौकशी सुमारे दोन ते तीन तास चालली. त्यानंतर तपास यंत्रणेनं त्यांना सोमवारी म्हणजेच, 25 जुलै रोजी हजर राहण्यास सांगितलं होतं. परंतु सोनिया गांधी यांना आता सोमवारी (25 जुलै) नव्हे तर मंगळवारी (26 जुलै) तपास यंत्रणेसमोर हजर राहणं आवश्यक असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. तारीख बदलण्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. पण त्यावेळी कोरोनाची लागण झाल्यानं त्या चौकशीसाठी उपस्थित राहिल्या नव्हत्या. कोरोनामुक्त झाल्यानंतर सोनिया गांधी ईडी चौकशीला उपस्थित राहिल्या. त्यामुळे कोविड प्रोटोकॉल लक्षात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली होती, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. यावेळी सोनिया गांधी यांच्यासोबत पुत्र राहुल गांधी आणि कन्या प्रियांका गांधी वाड्राही उपस्थित होत्या. सोनिया गांधी यांचं वय आणि प्रकृती लक्षात घेऊन ईडीनं प्रियांका गांधी यांना विशेष सूट म्हणून ईडी कार्यालयातील चौकशी कक्षापासून दूर आईसोबत जाण्याची परवानगी दिली होती.
Belgaum Varta Belgaum Varta