नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नॅशनल हेराल्डच्या मुख्यालयावर छापा टाकला आहे. नॅशनल हेराल्ड गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून दिल्लीतील अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे.
सध्या नॅशनल हेराल्डच्या चौथ्या मजल्याची ईडीकडून झडती घेतली जात आहे. याच मजल्यावर वृत्तपत्राचं कार्यालय आहे. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास ईडीचे अधिकारी नॅशनल हेराल्डच्या इमारतीत शिरले होते, अद्याप त्यांची छापेमारी सुरू आहे.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी दिल्लीतील काँग्रेसच्या मालकीच्या नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या कार्यालयासह 12 ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. याशिवाय ईडीकडून कोलकाता येथील काही ठिकाणी छापे टाकण्याची शक्यता आहे.