जयराम रमेश यांनी दिली माहिती
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांची अंमलबजावणी संचालनालयकडून (ईडी) चौकशी सुरु आहे. त्यांच्यावर नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. याबाबत काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी माहिती दिली आहे.
जयराम रमेश म्हणाले की, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांची ईडीकडून गेल्या साडेचार तासांपासून चौकशी सुरू आहे. याआधी खर्गे यांनी राज्यसभेत माहिती दिली की, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चालू कामकाजादरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने त्यांच्याविरुद्ध समन्स जारी केले होते. ते म्हणाले की, केंद्र सरकार काँग्रेस पक्षाला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे.
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, मला दुपारी साडेबारा वाजता बोलावण्यात आले. मला कायद्याचे पालन करायचे आहे, पण संसदेचं अधिवेशन सुरु असताना त्यांचं बोलावणं योग्य आहे का? सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निवासस्थानांचा पोलिसांनी घेराव करणे योग्य आहे का? आम्हाला घाबरवण्यासाठी हे केले जात आहे. आम्ही घाबरणार नाही, आम्ही लढू.
खर्गे यांच्या तक्रारीला उत्तर देताना राज्यसभेतील सभागृहनेते पियुष गोयल म्हणाले की, केंद्राचा याच्याशी काहीही संबंध नाही. गोयल म्हणाले, अंमलबजावणी अधिकाऱ्यांच्या कामात सरकार हस्तक्षेप करत नाही. कदाचित त्यांच्या कार्यकाळात ते सरकारमध्ये असताना हस्तक्षेप करत असावेत. गोयल म्हणाले की, तपास यंत्रणा त्यांचे काम करत आहेत. ज्यांनी काही चूक केली आहे, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta