बीरभूम : पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात मंगळवारी (ता. ९) मोठी दुर्घटना घडली. बीरभूममध्ये बस व ऑटो यांच्यात झालेल्या धडकेत ऑटोतील नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला. ही घटना राणीगंज-मोरग्राम राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० जवळील रामपूरहाट पोलिस ठाण्याच्या तेलदा गावाजवळ घडली. ऑटोमधील प्रवासी भात लावणीचे काम आटोपून गावाकडे परतत होते.
अपघाताची माहिती मिळताच गावात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी स्थानिक लोक मदतकार्यात गुंतले आहे. पोलिसही घटनास्थळी पोहोचले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. दक्षिणबंगा नॅशनल ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची बस रामपूरहाटहून सिउरीच्या दिशेने जात होती. दरम्यान, बसने ऑटोला धडक दिली.
या भीषण अपघातात ऑटोमधील लोकांचा जागीच मृत्यू झाला. ऑटो चालकाला गंभीर अवस्थेत रामपूरहाट उपविभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शी शिवदास लेख म्हणाले, मी मल्लारपूरहून येत होतो. एक बस मालदाहून सुरीला जात होती. मल्लारपूर बाजूकडून ऑटो येत होता. अनेकजण शेतात भात रोवून घरी परतत होते.
ऑटो योग्य दिशेने जात होता. मात्र, अचानक हा अपघात झाला. डोळ्यासमोर हा प्रसंग घडला. अपघात घडताच आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावू लागले. ऑटो काढताच घटनास्थळी ९ जणांचे मृतदेह आढळले. हे सर्व लोक ऑटोने जात होते. या घटनेने पारकांडी गावावर शोककळा पसरली आहे.