हैदराबाद : प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या भाजपाचे निलंबित आमदार टी राजा सिंह यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे. यापूर्वी 23 ऑगस्ट रोजी त्यांना याच प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र, सायंकाळी स्थानिक न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. राजा यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा पोलिसांनी राजा यांच्यावर दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये 41 (ए) अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये अटक केली आहे. फेब्रुवारी आणि एप्रिल 2022 मध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राजा यांना पीडी अॅक्ट (प्रतिबंधक अटके) अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
टी राजा सिंह यांचा स्टॅण्डअप कॉमेडियन मुन्नवर फारुकीसंदर्भात बोलतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ते प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे दिसत असल्याचे म्हटले जात आहे. हैदराबादसह देशभरातून या घटनेविरोधात संताप व्यक्त करण्यात आला होता. तसेच सिंह यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी केली जात होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. दोन गटांत द्वेषभाव निर्माण करणे, धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न करणे, अशा भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांतर्गत टी राजा सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, सांयकाळपर्यंत त्यांना जामीनावर सोडण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा त्यांना अटक करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta