जयपूर : काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे सक्रिय झाले आहेत. एकीकडे खासदार शशी थरूर हे देखील पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येत असताना अशोक गेहलोत यांनी आज रात्री 10 वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गेहलोत हे उमेदवार असू शकतात.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक गेहलोत 26 सप्टेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. गेहलोत यांनी बोलावलेल्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षांबाबत काही मोठी माहिती समोर येऊ शकते. आज उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या स्वागतात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. स्वागत मेजवानीनंतर विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे.
काँग्रेस अध्यक्षपदावरून पक्षात हालचालींना वेग आलेला असताना अशोक गेहलोत हे उद्या दिल्ली दौर्यावर जाणार आहेत. गेहलोत उद्या दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. याच दरम्यान अशोक गेहलोत यांनी अध्यक्षपदाची चर्चा आधीच फेटाळून लावली आहे. यातच राहुल गांधी यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारावं अशी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची इच्छा आहे. त्यांचं मन वळवण्यासाठी प्रयत्न देखील सुरु आहे. मात्र ते निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
Belgaum Varta Belgaum Varta