नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या कार्यालयांवर आणि त्यांच्या नेत्यांच्या घरांवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूसह 10 राज्यांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएफआयशी संबंधित 100 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.
एनआयएचे 200 हून अधिक अधिकारी आणि सदस्य ही छापेमारी करत आहेत. हे छापे टेरर फंडिंग, प्रशिक्षण शिबिरे उभारणे आणि प्रतिबंधित संघटनांमध्ये सामील होण्यासाठी लोकांची दिशाभूल करणाऱ्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर टाकले जात आहेत.
पीएफआय चेअरमनच्या घरी पोहोचली एनआयए
एनआयएच्या या छाप्यात पीएफआयच्या सर्व अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत. यामध्ये पीएफआयचे अध्यक्ष ओएमए सलाम यांच्या केरळमधील मांजेरी येथील घरावरही छापा टाकण्यात आला आहे. हे छापे रात्री उशिरा सुरू झाले आणि ते आतापर्यंत सुरू असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये पीएफआयच्या सर्व लहान-मोठ्या कार्यालयांचा समावेश आहे. या छाप्याचे वृत्त समजताच पीएफआय कार्यकर्त्यांनी याला विरोध केला आहे.
आंध्र प्रदेश आणि तेलंगणमधूनही अटक
यापूर्वी एनआयएने आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये अनेक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले होते. यादरम्यान सुमारे 40 ठिकाणी छापे टाकण्यात आले, ज्यामध्ये काही लोकांना अटक करण्यात आली. या छाप्यात अनेक डिजिटल उपकरणे, कागदपत्रे आणि रोख रक्कम जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ताब्यात घेतलेल्या लोकांची अनेकदा चौकशीही करण्यात आली आहे. चौकशीच्या आधारे आता केरळ आणि इतर ठिकाणी छापे टाकण्यात येत असल्याचे समजते.
Belgaum Varta Belgaum Varta