इस्लमाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. या हल्ल्यात इम्रान हे जखमी झाले असून त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांना सध्या रुग्णालयाता दाखल करण्यात आले आहे. हा गोळीबार कुणी केला, हल्लेखोर कोण होते, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पण याविषयी तपास यंत्रणा सतर्क झाली आहे. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
वझिराबादमधील चौकात ही रॅली सुरु असताना हा हल्ला झाला. यामध्ये इम्रान खान यांच्यासह ७ जण जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. या हल्ल्यात इम्रान खान यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
इम्रान खान हे ओपन जीपमधून रॅलीमध्ये सहभागी झाले होते. पण गोळीबारानंतर त्यांना बुलेटप्रुफ वाहनातून पुढे रुग्णालयात नेण्यात आल्याचं या रॅलीच्या व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसतंय. या हल्ल्यामध्ये इम्रान खान यांचे सहकारी आणि पीटीआयचे नेते फैजल जावेद हे देखील जखमी झाले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta