टांझानियातील व्हिक्टोरिया तलावात एक प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे विमान ४३ जणांना घेऊन जात होतं. पण खराब हवामानामुळे हे प्रवासी विमान तलावात कोसळलं आहे. या घटनेची माहिती मिळातच पोलीस दल आणि बचाव दलाची पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत. विमानातील प्रवाशांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहे.
टांझानियाचे विभागीय आयुक्त अल्बर्ट चालमिला यांनी सांगितलं की, टांझानियाची राजधानी दार एस सलाम येथून हे विमान कागेरा येथे जात होतं. यावेळी या विमानात ३९ प्रवासी, दोन पायलट आणि दोन केबिन क्रू असे एकूण ४३ लोक होते. खराब हवामानामुळे हे विमान बुकोबा विमानतळावर उतरत होतं. दरम्यान, विमानतळापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर हा अपघात घडला आहे.
आतापर्यंत एकूण २६ प्रवाशांना अपघातग्रस्त विमानातून बाहेर काढलं आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बचावकार्य अद्याप सुरू असून वैमानिकाकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली जात आहे. याबाबतचा सविस्तर तपशील नंतर जाहीर केला जाईल, अशी माहिती चालमिला यांनी दिली. जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही.
Belgaum Varta Belgaum Varta