नवी दिल्ली : दहशतवादाविरुद्ध संपूर्ण जगाने एकत्र येण्याची गरज असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलं आहे. नवी दिल्लीत ‘नो मनी फॉर टेरर’ या विषयावर आयोजित परिषेदत ते बोलत होते. दहशतवादाला होणारा आर्थिक पुरवठा हाच या परिषदेचा मुख्य विषय होता. दहशतवाद आपल्या दारापर्यंत येईपर्यंत आपण वाट पाहू शकत नाही असंही यावेळी त्यांनी ठणकावून सांगितलं.
दहशतवादाला मुळापासून संपवण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळण्याची गरज आहे. जर आपल्याला नागरिकांना सुरक्षित ठेवायचं असेल तर दहशतवाद आपल्या घरापर्यंत येईपर्यंत आपण थांबू शकत नाही. आपण दहशतवाद्यांची माहिती मिळवत त्यांचा शोध घेतला पाहिजे, त्यांचं नेटवर्क तोडलं पाहिजे आणि त्यांचा आर्थिक पुरवठा रोखला पाहिजे, असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी राज्य पुरस्कृत दहशतवादावरही भाष्य करत त्यांना रोखण्याची गरज असल्याचं म्हटलं. ज्या संस्था आणि व्यक्ती दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यांना वेगळं केलं पाहिजे असंही परखड मत त्यांनी मांडलं.
काही देश आपल्या विदेशी धोरणाचा भाग म्हणून दहशतवादाला पाठिंबा देतात. ते राजकीय तसंच आर्थिक पाठिंब्याचं आश्वासन देतात. अशा देशांवर किंमत लादण्याची गरज आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
भारताला गेली अनेक दशकं दहशतवादाचा फटका बसला असून, दरवेळी मोठ्या धीराने सामना केला असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले. प्रत्येक हल्ला हा अनेकांवर होणारा हल्ला असल्याचं आम्ही मानतो. एका व्यक्तीचा जीव हा आमच्यासाठी अनेकांच्या समान आहे. त्यामुळे जोपर्यंत दहशतवाद पूर्णपणे संपवत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा निर्धार मोदींनी व्यक्त केला आहे.