नवी दिल्ली : देशाला हादरवणार्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला यानं कोर्टासमोर आपला कबुलीनामा दिला आहे. रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याचे आफताबनं कोर्टात कबुल केले आहे. दरम्यान, आरोपी आफताबची पोलीस कोठडी आज संपल्यामुळे त्याला दिल्लीतील साकेत कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी आफताबने दिल्लीतील साकेत कोर्टात कबुली दिली. आफताबच्या पोलीस कोठडीच चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
साकेत कोर्टासमोर कबुली देताना आरोपी आफताब पूनावालाने न्यायालयात सांगितले की, घटना क्षणार्धातच घडली. तपासात सहकार्य करत असल्याचंही त्यानं कोर्टाला सांगितले. तसेच पुढे बोलताना मला घडलेली घटना नीट आठवत नसल्याचंही त्यांनं कोर्टाला सांगितले.
श्रद्धा हत्याकांड प्रकरणात आफताब एखाद्या प्रोफेशनल किलरप्रमाणे पोलिसांची सतत दिशाभूल करत असल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. आफताबने चौकशीदरम्यान सांगितले की, श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी त्यानं तीन करवतीच्या ब्लेडचा वापर केला होता. त्यानंतर ते ब्लेड डीएलएफ, गुरुग्राम येथील त्याच्या कार्यालयाजवळ फेकून दिले होते. आफताबनं दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सलग दोन दिवस ब्लेड्सचा शोध घेतला. पण तिथे काहीच सापडलं नाही. बुधवारी (23 नोव्हेंबर) पोलीस पुन्हा एकदा शोधमोहीम राबवणार असून यावेळी पोलीस आफताफला सोबत घेऊन जाण्याची शक्यता आहे.
Belgaum Varta Belgaum Varta