केंद्रीय गृहमंत्री अमित शहा; आयटीबीपीच्या कार्यालयाचे उद्घाटन
बंगळूर : चीनच्या सीमेवरील भारताची जमीन हडपण्याचे धाडस कोणीही करू शकत नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी प्रतिपादन केले. त्याचे श्रेय त्यांनी इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) च्या जवानांना दिले.
मला भारत-चीन सीमेची कमीत कमी काळजी वाटते. कारण मला माहित आहे की आमचे इंडो-तिबेट बॉर्डर जवान तेथे उभे आहेत आणि भारताची एक इंचही जमीन बळकावण्याचे धाडस कोणी करू शकत नाही, असे शाह म्हणाले.
देवनहळ्ळी येथे आयटीबीपीच्या नव्याने बांधलेल्या कार्यालयाचे आणि निवासी इमारतींचे उद्घाटन आणि पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोच्या (बीपीआर अँड डी) केंद्रीय गुप्तहेर प्रशिक्षण संस्थेच्या (सीडीटीआय) पायाभरणीनंतर शहा बोलत होते.
सर्व केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांपैकी शाह म्हणाले की, इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस सर्वात कठीण परिस्थितीत काम करतात. “आम्ही कल्पनाही करू शकत नाही… – ४२ अंश तापमानात देशाचे रक्षण करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रखर देशभक्ती आवश्यक आहे, असे ते म्हणाले, आयटीबीपीने अत्यंत कठीण परिस्थितीत चांगली कामगिरी केली आहे.
अरुणाचल असो, काश्मीर असो की लडाख, आयटीबीपी जवानाला भारतातील लोक ‘हिमवीर’ म्हणून ओळखतात, असे शाह म्हणाले. “मला विश्वास आहे की हा सन्मान पद्मश्री किंवा पद्मविभूषणपेक्षा मोठा आहे कारण हा सन्मान सरकारने नाही तर देशातील जनतेने दिला आहे, असे त्यांनी सांगितले.
शहा यांनी पोलिसिंगमधील संशोधनाच्या महत्त्वावरही भर दिला. बंगळुरमध्ये सुरू होणारी सीडीटीआय, ज्यासाठी राज्य सरकारने देवनहळ्ळी येथील अवथी गावात ३५ एकर जमीन मंजूर केली आहे, ती कर्नाटक आणि त्याच्या शेजारच्या राज्यांतील पोलिस दलांना मदत करेल.
संपूर्ण पोलीस दलासाठी काही आव्हाने गेल्या काही वर्षांत उभी राहिली आहेत. अंमली पदार्थ, बनावट चलन, हवाला, दहशतवाद, सीमावर्ती राज्यांमधील अवैध स्थलांतर आणि किनारपट्टीच्या समस्या आदी आव्हानाना त्यांना सामोरे जावे लागते. आपण मोठ्या शहरांमधील आव्हानांवरही लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे शहा म्हणाले. जर आम्ही पुरेसे संशोधन केले नाही आणि पोलिसिंगच्या बाबतीत आमची रणनीती बदलली नाही, तर आम्ही आमच्या शहरांचे संरक्षण योग्यरित्या पार पाडू शकणार नाही.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र, आरोग्य मंत्री के. सुधाकर, आयटीबीपीचे महासंचालक अनिश दयाल सिंग, बीपीआर अँड डीचे महासंचालक बालाजी श्रीवास्तव आदी यावेळी उपस्थित होते.