नवी दिल्ली : 31 डिसेंबरच्या रात्री घडाळ्याच्या काट्याने बाराचा आकडा गाठल्याबरोबर देशभरात नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आलं. जल्लोषात, फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये भारतीयांनी नवीन वर्षाचे स्वागत केले. जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी आणि महाराष्ट्र ते पश्चिम बंगाल संपूर्ण देशभरात नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटनस्थळावर गर्दी झाली आहे. त्याशिवाय अनेक जणांनी मंदिरात जाऊन 2022 वर्षाला निरोप दिला अन् नव्या वर्षासाठी नवा संकल्प केलाय.
मुंबई, पुणे, दिल्ली, मनाली, गोवा, कोलकाता, चेन्नईसह देशभरातील सर्वच शहरात नव्या वर्षाचं स्वागत जल्लोषात करण्यात आले. नागरिकांनी 2022 ला निरोप देत 2023 चं मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केलं. येथील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या व्यतिरिक्त अनेक लोकांनी सन 2022 ची सर्व दु:खे विसरून नव्या वर्षाचे स्वागत केले.
महाराष्ट्रातही जल्लोषात स्वागत
पुणे, मुंबई, नागपूरसह राज्यभरात नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आले. मुंबईमध्ये ठिकठिकाणी लोक रस्त्यावर जमले होते. 12 वाजता मरीन ड्राईव्हवर आतषबाजी झाली अन् लोकांनी एकच जल्लोष करण्यास सुरुवात झाली होती.
पर्यटन स्थळ हाऊसफुल्ल
2022 ला निरोप देण्यासाठी आणि 2023 च्या स्वागतासाठी अनेकांनी पर्यटनस्थळाला हजेरी लावली. लोणावळा, खंडाळा, माथेरान, कोकण, गोवा, मनाली, हिमाचलप्रदेश, जम्मू काश्मीर यासह विविध पर्यटन स्थळावर गर्दी उसळली होती. तीन वर्षानंतर कोरोनाचा जोर ओसरला आहे, त्यामुळे नागरिक नव्या वर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडले आहेत.
मंदिरामध्ये लोकांची गर्दी
2022 वर्षाच्या अखेरच्या दिवशी अनेकांनी मंदिरात जाणं पसंत केलं. तुळजापूर, शिर्डी, पंढरपूर, कोल्हापूर यासह राज्यातील सर्वच मंदिरात गर्दी झाली होती. देवाचं दर्शन घेत अनेकांनी 2022 वर्षाला निरोप दिला.
मनालीमध्ये नव्या वर्षाचा उत्सव, लोकांनी केला तुफान डान्स
नव्या वर्षाचं स्वागतासाठी मनालीमध्ये गर्दी उसळली आहे. उत्साहात नव्या वर्षाचं स्वागत करत आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये अनेक पर्यटक पोहोचले आहेत. मनालीमध्ये पर्यटकांनी जुन्या वर्षाला निरोप देताना अन् नव्या वर्षात पदार्पण करताना तुफान डान्स केला.
गोव्यात डीजे नाईट
गोव्यात नव्या वर्षाचा जल्लोषात स्वागत पाहायला मिळालं. 2023 च्या स्वागतासाठी गोव्यात लाखो पर्यटक पोहोचले. क्लब, पब आणि नाइट पार्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने गर्दी झाली. लोकांनी आपापल्या पद्धतीने नव्या वर्षाचे स्वागत केले.