नवी दिल्ली : जे. पी. नड्डा यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा काळ वाढवण्यात आला आहे. जून २०२४ पर्यंत जे. पी. नड्डाच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील असं जाहीर करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ही घोषणा काही वेळापूर्वीच केली. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ दुसऱ्या कुणाच्या गळ्यात पडणार का? याची चर्चा सुरू होती. मात्र तसं घडलेलं नाही. जे. नड्डा हे जून २०२४ पर्यंत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असणार आहेत.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी जे. पी. नड्डांकडे मोठी जबाबदारी
२०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने जे. पी. नड्डांकडे संघटनात्मक जबाबदारी देण्यात आली आहे. जे. पी. नड्डा यांनी सोमवारी एक भाषण केलं होतं त्यात ते भाजपाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले होते की मी तुम्हाला सूचना देतो, माहिती घेतो हे कधी तुम्हाला आवडतही नसावं पण मी पक्षाचा अध्यक्ष आहे त्यामुळे माझी ही जबाबदारी आहे. त्यापुढेही देत राहणार आहे, असंही सांगितलं होतं. त्यामुळे जे. पी. नड्डा यांना मुदतवाढ मिळू शकते याचे संकेत मिळालेच होते. त्यानुसार भाजपाच्या कार्यकारणीमध्ये राजनाथ सिंह यांनी जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ वाढवला जावा हा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सगळ्यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवला गेला आहे अशी घोषणा केली.