Monday , December 8 2025
Breaking News

शिवसेना कोणाची? निवडणूक आयोगासमोर ठाकरे गटाचा शेवटचा डाव

Spread the love

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष कोणाचा, पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचे, यावर ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद सुरू आहे. या वादावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. आज दोन्ही गटांना लेखी युक्तिवाद सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. ठाकरे गटाने आज लेखी स्वरुपात आपलं म्हणणं सादर केले. कुठल्याही पातळीवर तपासलं तरी न्यायाची बाजू आमची असल्याचा दावा ठाकरे गटाने निवडणूक आयोगासमोर केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाने आज निवडणूक आयोगाला सादर केलेल्या लेखी युक्तिवादात एकनाथ शिंदे यांच्या बंडांची माहिती देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाला 20 जून 2022 पासूनच्या घटनाक्रमांची माहिती देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेले मुख्य नेतेपद हे शिवसेनेच्या घटनाविरोधी असल्याचा युक्तिवाद ठाकरे गटाने केला आहे. शिंदे गटाने पक्षावर आणि पक्ष चिन्हावर केलेला दावा हा चुकीचा असल्याचेही ठाकरे गटाने म्हटले.
पक्ष म्हणजे आमदार-खासदारांचा नसतो. तर पक्ष हा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा असतो. आम्ही त्याचे पुरावे दिले आहेत. जवळपास तीन लाख पदाधिकारी आणि 20 लाख प्राथमिक सदस्यांचे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आली असल्याचे शिवसेना नेते ऍड. अनिल परब यांनी सांगितले. आमची बाजू उजवी आणि सत्यावर आधारीत असल्याने आमच्या बाजूने निकाल लागेल असा युक्तिवाद ठाकरे गटाने केला आहे.
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, आमदार-खासदारांना मिळालेली मते हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मिळाली आहेत. ही मते उमेदवारांच्या नावावर मिळाली नाहीत, असेही त्यांनी म्हटले. उद्या, विधानसभेत एकच संख्याबळ असलेल्या पक्षाच्या आमदाराने पक्षांतर केले तर, त्याच्यासोबत संपूर्ण पक्ष गेला, असे म्हणणार का, असा प्रश्नही खासदार सावंत यांनी केला.

शिंदे गटाकडून अखेरच्या क्षणी उत्तर दाखल

निवडणूक आयोगाने दिलेली मुदत संपण्यास काही मिनिटांचा अवधी असताना शिंदे गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगात हजर राहत शिवसेना पक्षावर आणि धनुष्यबाणावर दावा केला. एकनाथ शिंदे यांचे मुख्य नेतेपद हे घटनात्मक आहे. पक्षाच्या लोकप्रतिनिधींची संख्या आमच्याकडे अधिक आहे. निवडणूक चिन्ह देताना संख्याबळ विचारात घेतलं जावं असा मुद्दा शिंदे गटाने उपस्थित केला.

दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्रं आयोगासमोर सादर

शिवसेनेच्या ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत 160 राष्ट्रीय कार्यकारणी प्रतिनिधी, 2,82,975 संघटनात्मक प्रतिनिधी, 19,21,815 प्राथमिक सदस्य अशा एकूण 22 लाख 24 हजार 950 पक्षसंघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे सादर केली आहे. तर शिंदे गटाने 12 खासदार, 40 आमदार, 711 संघटनात्मक प्रतिनिधी, 2046 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी आणि 4,48,318 प्राथमिक सदस्य अशा 4,51,127 पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे आयोगाकडे सादर केली आहेत.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *